नागपूर / मुंबई : नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला असला तरी त्यातील राजकीय वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत. साहित्यिकांनीही पक्षांच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देणे योग्य नसून त्यांनी मर्यादेचे पालन करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून केलेले विधान मूर्खपणाचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेची झोड उठविली.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘‘साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात आली. हे कितपत योग्य वाटते,’’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवायला हव्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली होती. संमेलनाच्या विविध सत्रांमध्येही राजकीय शेरेबाजी झाल्यानेही नाराजी व्यक्त केली गेली. यावर फडणवीसांनी साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात, असे सांगितले. गोऱ्हे यांच्या आरोपांबाबत विचारले असता ‘‘त्या ज्या पक्षात होत्या तेथे काय प्रकार चालतात ते त्याच सांगू शकतात,’’ असे सांगत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

दुसरीकडे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी गोऱ्हेंवर टीका केली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गोऱ्हे यांनी केलेले विधान हे मूर्खपणाचे आहे. मी यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, असे पवार म्हणाले. गोऱ्हेंच्या विधानानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. राऊत यांना माझ्यावर गोऱ्हे यांच्या विधानाची जबाबदारी टाकायची असेल तर त्याला माझी तक्रार नाही, असेही पवार म्हणाले.

चार पक्ष बदलणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना कमी कालावधीत चार वेळा आमदारकी कशी मिळाली हे महाराष्ट्राला माहीत आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (शप)

अनेक साहित्यिकांना वाटते की, राजकारणी आमच्या व्यासपीठावर येऊ नये. मग त्यांनीही पक्षाच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. – देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री

Story img Loader