सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. “इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “काही लोक प्रश्न उपस्थित करतात की ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? त्यासाठी काय करायचं, एवढी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंकाही व्यक्त करतात. मला आनंद आहे की या परिषदेत सर्वांनी केंद्र सरकारने ओबीसींची जातीय जनगणना करावी असा ठराव मान्य केला. एकदा करून टाकुयात, एकदा कळू द्या देशाला की नक्की ओबीसींची संख्या काय आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी.”
“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही”
“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे तो न्यायाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो किती न्याय मिळावा हे सांगायचं असेल, ठरवायचं असेल तर या प्रकारची जनगणना केली पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
“देशाची सूत्रं हातात असणाऱ्यांकडून हा निर्णय होईल असं वाटत नाही”
शरद पवार पुढे म्हणाले, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा ओबीसी जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला आहे. नितीश कुमार यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं हे बाकीचं धोरण मान्य नाही, आम्हाला जातीनिहाय जनगणना हवी आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांच्याकडून हा निर्णय होईल असं वाटत नाही. यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही.”
“सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का?”
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याची जोशी यांनी एका ठिकाणी बोलताना जातीनिहाय जनगणना मला अजिबात मान्य नाही असं सांगितलंय. का नको तर यांचं कारण सांगताना त्यांनी समाजातील एकीवर प्रहार होईल असं कारण सांगितलं, चुकीचं वातावरण निर्माण होईल. सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का? सत्य समोर आलं, ओबीसी नेमके किती आहेत, त्याची अवस्था काय आहे याची वस्तुस्थिती संबंध देशासमोर आली तर त्याने देशात अस्वस्थता निर्माण होईल का?” असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
हेही वाचा : “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन”, सोलापूरच्या शेतकऱ्याचा Video व्हायरल
“…तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही”
“जर कुणाला वाटत असेल की जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण होईल तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका गेत शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.