मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वी झालेल्या सर्व नेमणुका या पक्षाच्या घटनेतील तरतुदीला अनुसरून झालेल्या नाहीत. पक्षाच्या खालच्या पातळीपासून ते सर्वोच्च स्तरावरील अध्यक्षपदापर्यंत निवडणुका न होता नेमणुका झालेल्या आहेत. या नेमणुका सदोष आहेत. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची केलेली निवडही सदोष आणि बेकायदा असल्याचा दावा खासदार प्रफुल पटेल यांनी केला. पक्षावरील हक्क, चिन्ह याबाबत आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ३० जूनलाच अर्ज केल्याची माहितीही त्यांनी दिली.
आमच्या पक्षाची घटना असून ती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यानुसार काही नियम सर्वाना बंधनकारक आहेत. देशातील सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्या सहीने नियुक्त्या झाल्या आहेत. यामध्ये राज्याच्या प्रमुखांचाही समावेश होतो. मात्र या नियुक्त्या पक्षाच्या संविधानानुसार झालेल्या नाहीत, असा दावा पटेल यांनी केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ व सुनील तटकरे उपस्थित होते. प्रत्येक स्तरावर निवडणूक होऊन त्यानंतर वरच्या पातळीवरील पदाधिकाऱ्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे मी केलेली नियुक्तीही अधिकृत नाही. जयंत पाटील यांची नियुक्तीही बेकायदा ठरते. त्यामुळे ते पक्षातून कोणाला काढू शकत नाहीत अथवा कोणा आमदाराविरोधात अपात्रतेविषयी कारवाई करण्याची याचिका दाखल करू शकत नाहीत, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
‘देवगिरी’ या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात ३० जून रोजी बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वानुमते अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पवार यांनी मला पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. मी पवार यांना विधिमंडळ नेता आणि अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून तर विधान परिषदेत प्रतोद म्हणून अमोल मिटकरी यांना नेमले आहे. तसे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना कळविले आहे, असे पटेल म्हणाले.
शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरुवात
अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या सर्वाना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. यानुसार छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघापासून शनिवारपासून राज्यव्यापी दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. भुजबळांच्या विरोधात शरद पवार काय बोलणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात विरोधी वातावरणनिर्मिती करण्याकरिता शरद पवार हे रिंगणात उतरले आहेत. येवला मतदारसंघात पवार भुजबळांची झाडाझडती घेण्याची शक्यता आहे. भाजपबरोबर जाण्यावरून पवारांवर भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्यात टीकाटिप्पणी केली होती.