राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवारांचा उल्लेख घरचा भेदी असा करत जोरदार घोषणाबाजी केली. तसंच आमचा नेता शरद पवार अशाही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय घेतला. तसंच आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाने पक्षाचं नाव कळवावं अन्यथा राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना अपक्ष म्हणून गृहीत धरलं जाईल असंही सांगितलं आहे. अशात आज हा निर्णय मान्य नसलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसंच अजित पवार यांचा उल्लेख घरचा भेदी असा करत घोषणा दिल्या.
शरद पवार हीच आमची ओळख
आमचा सध्या संघर्ष सुरु आहे. आम्हाला संघर्षातून वाट कशी काढायची ते शरद पवारांनी शिकवलं आहे. आम्ही सगळे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही. आम्ही शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उभे राहायचो. आज आम्हाला शरद पवारांचे कार्यकर्ते असं संबोधण्यात येतं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आमची ही ओळख हीच आहे. पक्षाचं नाव घेतलं, चिन्ह घेतलं तरीही आमची ओळख शरद पवार आहेत. आम्ही पुन्हा उभारी घेऊन उभे राहू असं घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांविरोधात घरचा भेदी अशा घोषणा
सामान्य लोकही चर्चा करत आहेत. संविधानाने दिलेले अधिकार आणि लोकशाहीने दिलेले अधिकार या माध्यमांतून आम्ही कार्यरत आहोत. ईडी, विधानभवन, विविध एजन्सी यांच्या माध्यमातून चुकीच्या कारवाया झाल्या. राज्यकर्ते दबाव टाकत आहेत. आज जी परिस्थिती उद्भवली आहे ती कुणामुळे? त्यामुळेच आम्ही घोषणा देत आहोत. घरचा भेदी असा उल्लेख अजित पवार यांचा करण्यात येत आहे. तसंच जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा अशाही घोषणा देण्यात आल्या.
हे पण वाचा- “लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना..”, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं आहे. अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे. त्याच निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. अजित पवारांकडे सध्या महाराष्ट्रातले ४१ आमदार आहेत. तर शरद पवारांकडे १५ आमदार आहेत.
अजित पवारांकडे किती संख्याबळ?
महाराष्ट्र- ४१ आमदार
नागालँड-७ आमदार
झारखंड-१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद- ५ आमदार
राज्यसभा १ खासदार
शरद पवारांसह किती आमदार?
महाराष्ट्र -१५ आमदार
केरळ -१ आमदार
महाराष्ट्र विधान परिषद -४ आमदार
लोकसभा खासदार-४
राज्यसभा ३
सध्याच्या घडीला असं संख्याबळ दोन्ही गटांकडे आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पाच आमदार आणि एक खासदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.