नव्यानेच सत्तेवर आलेल्या भाजपला बाहेरून पाठिंब्याचा टेकू देऊन स्थिरता प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी चक्क हातात झाडू घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला. बारामतीतील रस्त्यावर हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यात संपूर्ण पवार कुटुंबीयच सहभागी झाल्याने राष्ट्रवादीतील सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच सत्ताधाऱ्यांनाही बुचकळ्यात पाडले! विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रत्येक पाऊल सत्ताधारी भाजपकडे पडत असल्याचेच यातून निदर्शनास येत आहे. पवार यांची ही जवळीक भाजपच्या राज्यातील नेत्यांना अडचणीची वाटू लागली असतानाच राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना नवा घरोबा फार काही रुचलेली नाही व यामुळेच पक्षात अस्वस्थता वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार यांनी नरेंद्र मोदी यांची बाजू उचलून धरली तेव्हाच राष्ट्रवादीची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत याचा अंदाज आला होता. निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीने भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. तसेच भाजपचे राज्यातील सरकार पडणार नाही अशी कोणतीही कृती करणार नाही, असेही स्पष्ट केले. सत्तेच्या जवळ राहण्याच्या धोरणाचा भाग म्हणूनच राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता योजनेचा भाग म्हणून बारामतीमध्ये झाडू हातात घेऊन पवार स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. या वेळी पुतण्या अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे हे सुद्धा उपस्थित होते. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रवादी भाजपच्या जवळ गेला आहे. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी पहिल्या फळीतील नेत्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, चौकशांना सामोरे जावे लागणार आहे. भाजपच्या जवळ राहिल्याने या नेत्यांवर बालंट येणार नाही, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे.
भाजपबरोबरील जवळीक वाढल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवार यांची भूमिका फारशी रुचलेली नाही. सत्तेच्या जवळ राहून नेतेमंडळींची कामे होतील, पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते तर भाजपच्या जातीयवादावर नेहमीच टीका करायचे. पक्षाने सुरुवातीपासून निधर्मवादी भूमिका घेतली होती. भाजपच्या जवळ गेल्याने पक्षाच्या वाढीवर परिणाम होऊन नुकसानच होईल, अशी भीती नेतेमंडळी व्यक्त करू लागली आहेत.
आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली, आता भाजपचे सरकार आल्यावर भाजपला पाठिंबा. राष्ट्रवादीच्या या कृतीबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण राष्ट्रवादीने हे सारे ठरवून केले आहे.
– माणिकराव ठाकरे,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभागी झालेल्या पवार कुटुंबियांनी शुक्रवारी बारामतीतील रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवले. यावेळी पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी उपस्थित होते.

Story img Loader