राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील हॉटेल आणि परमिट बारसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र आता चर्चेत आलं आहे. भाजपाकडून या पत्रावरून शरद पवारांना आणि महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. एकीकडे भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्वीटरवरून शरद पवारांवर निशाणा साधला असताना आता भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनीही थेट शरद पवारांवर टीका केली आहे. “आजारपणातून उठल्या उठल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की बारचालकांना करामध्ये सवलत देण्यात यावी. वीजबिलात सूट देण्यात यावी. खरंतर या सरकारचं मंदिरापेक्षाही मदिरेवर आणि बार चालकांवर प्रेम का आहे याचं उत्तर आता कळायला लागलं आहे. कारण या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे आहेत”, असं तुषार भोसले म्हणाले आहेत.

“मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिसलं नाही!”

तुषार भोसले यांनी शरद पवारांवर मजूर, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून देखील टीका केली आहे. “शरद पवारांना ज्यांचं हातावर पोट आहे असे मजूर दिसले नाहीत. लोककलावंतांची उपासमार सुरू आहे ते दिसलं नाही. मंदिरांवर अवलंबून असलेले हार-फुलं विकणारे लोकं आणि त्यांचं हातावरचं पोट त्यांना दिसलं नाही. शेतकऱ्यांची वीजबिल सवलत त्यांना दिसली नाही. मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिसलं नाही. पण बारचालकांचं वीजबिल आणि त्यांचं नुकसान लक्षात आलं”, असं ते म्हणाले.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून निशाणा साधला आहे. “शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.

 

शरद पवारांनी पाठवलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले..

शरद पवारांच्या पत्रात काय आहे?

शरद पवार यांनी पत्रामध्ये राज्यातील एफएल-३ परवानाधारक हॉटेल आणि परमिट बारचालकांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. या चालकांना करामध्ये सूट मिळण्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. “एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमिट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी”, असा उल्लेख शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामध्ये आहे.

Story img Loader