राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातील दिशा कशी असेल हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केलेल्या त्रिसूत्रीवरूनच स्पष्ट होते. पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सूचक इशारा देतानाच राज्यातील सूत्रे ही अजित पवार यांच्याकडे असतील, असा संदेश दिला आहे.
राज्याची सत्ता आल्यास मुख्यमंत्री अजित की सुप्रिया हा नेहमीच चर्चेचा विषय राष्ट्रवादीमध्ये असतो. मध्यंतरी राजीनामा नाटय़ामुळे अजितदादांविषयी नेतृत्वामध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले होते. सुप्रिया सुळे या दिल्लीच्या राजकारणात तर अजित पवार हे राज्यात याचा पुनरुच्चार पवार यांनी पुन्हा एकदा केला. अजितदादांच्या समर्थकांमध्ये मोठे साहेब अशीच वेळ आली तर कोणती भूमिका घेतील याबाबत धाकधूक आहे. महाराष्ट्रात अजितदादाच हा संदेश पवार यांनी दिला आहे. अर्थात वेळ येईल तेव्हा परिस्थिती कशी असेल हे आताच सांगता येत नाही. पण अजितदादांना नक्कीच दिलासा देण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
स्वतंत्र तेलंगणाबाबत पवार यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. आपण या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा केली, असेही पवार यांनी सांगितले. स्वतंत्र तेलंगणानिमित्ताने राजकीय हित साधण्याचा पवार यांचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत बोलू लागले आहेत. उद्या तेलंगणा स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र विदर्भासाठी चळवळ सुरू होणार हे ओघानेच आले. विदर्भातील जनतेच्या आड येणार नाही, असे सांगत पवार यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध नाही हे सूचित केले. राज्याची सत्ता मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असला तरी विदर्भातील ६२ जागा राष्ट्रवादीसाठी तापदायक ठरतात. विदर्भात कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादी वाढत नाही. गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अन्य विभागाच्या तुलनेत विदर्भात अपयशच आले होते. महाराष्ट्रात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात विदर्भाचा मोठा हातभार असतो. कारण २० ते २५ काँग्रेसचे आमदार या भागातून निवडून येतात. उद्या विदर्भ वेगळा झाल्यास महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद कमी होईल हे त्यामागचे गणित असल्याचे बोलले जाते. नाही तरी विदर्भ वेगळा देऊन टाका, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खासगीत मत असतेच. स्वतंत्र विदर्भाला अनुकूल असल्याचे सांगत पुढील निवडणुकीत मते वाढविण्याचाही हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्रातून जास्त खासदार निवडून आल्याशिवाय पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पवार यांचे वजन वाढणार नाही. नवे चेहरे लोकसभेला उपयोगी पडत नाहीत, असे पवार यांचे निरीक्षण आहे. यातूनच छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, जयदत्त क्षीरसागर या ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेला उभे करण्याची पवार यांची योजना आहे. ज्येष्ठ मंत्री दिल्लीत गेले म्हणजे राज्यात अजित पवार यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात अडचण येणार नाही, असेही गणित त्यामागे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा