राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फक्त पश्चिम महाराष्ट्राचाच दौरा करतात, या गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्या खरपूस टीकेनंतर आता पवार यांचा मराठवाडा दौरा येत्या रविवारपासून सुरू होत असल्याने, पवार यांच्या प्रत्युत्तराकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार हे देशातील सर्वच भागांमध्ये भेटी देत आहेत. रविवार आणि सोमवारी शरद पवार औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ांचा दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले व त्यांनी सभा घेतली. प्रत्यक्ष दुष्काळी भाग किंवा दुष्काळाची झळा बसलेल्या लोकांच्या भेटी त्यांनी घेतल्या नाहीत. याउलट मराठवाडा दौऱ्यात पवार मात्र दुष्काळी भागातील कामांची पाहणी करतील व लोकांशी संवाद साधतील, असे मलिक यांनी सांगितले. शिवसेना आता दुष्काळावर आक्रमक होण्याची भाषा करते, पण हिवाळी अधिवेशनात दुष्काळावर चर्चा झाली तेव्हा शिवसेनेचे आमदार का बोलले नाहीत, असा सवालही मलिक यांनी केला.
दुष्काळी परिस्थिती हाताळण्याकरिता राज्य शासन प्रयत्न करीत आहे. लोकांना पाणी, चारा मिळाला पाहिजे यावर भर देण्यात आला. विरोधकांनी मात्र या प्रश्नावर जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. ‘गोबेल्स गुरुजी’ मुंडे हे खोटेनाटे आरोप करीत आहेत. प्रादेशिक असमतोल कोणी निर्माण केला, असा सवाल करीत राष्ट्रवादीने मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडण्यास विरोधकांना दोष दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा