महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि मुख्यमंत्रीपदावरून निवडणुकीआधी जाहीर झालेल्या शिवसेना-भाजपा युतीत तणाव निर्माण झाला. यानंतर राज्याच्या इतिहासातील सर्वच राजकीय समीकरणं बदलली. यावेळी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र झोपेत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला आणि राजकीय भूकंप झाला. मात्र, यानंतर स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेत फुटू शकणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन हा भूकंप अल्पजीवी ठरवला. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार यांचा फडणवीस आणि भाजपासोबत जाण्याचा निर्णय आजही दंतकथा म्हणून चर्चिला जातो. शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचं बोललं जातं. मात्र, आता या गुपिताचा स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केलाय. पवारांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा होत असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती.”
“माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं”
“तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपाकडे बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसलं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येऊ पाहणाऱ्या भाजपा बाजूला करायचं असेन तर त्यांना सोयीची भूमिका घेणं शक्य नव्हतं. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं की, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं,” असं शरद पवार यांनी मिश्किलपणे सांगितलं.
“…तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो”
शरद पवार पुढे म्हणाले, “साधी गोष्ट आहे की ते दोघे एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होतं आणि ते तातडीने मुख्यमंत्रीपद हवंय म्हणत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरतं पोषक वक्तव्य केल्यानं नुकसान होणार नव्हतं. माझ्या या एका वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात ही शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली.”
मुलाखतीचा व्हिडीओ पाहा :
“माझी व पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी-भाजपाने एकत्र येण्यावर चर्चा झाली होती”
“हे खरं आहे की माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितलं. निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हतं. त्यामुळे सेना-भाजपात खूप अंतर वाढलं होतं. त्यामुळे भाजपाला महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेन,” असं पवारांनी सांगितलं.
“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा बैठका झाल्या तेव्हा या दोन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांमध्ये कटुता वाढली होती. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेणं शक्य आहे हा विचार भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात असू शकतो. त्यामुळे त्यांनी चाचपणी केली असावं,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.