लोकसभा निवडणुकीत यूपीएला सत्ता स्थापनेएवढे संख्याबळ नसल्यास आम्ही विरोधी बाकांवर बसू, पण भाजपला पाठिंबा देणार नाही. तसेच राज्य विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेसबरोबरच लढू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. मनसेला दुर्लक्षून चालणार नाही हे मत मांडतानाच शिवसेना नेतृत्वात दोष असावा म्हणून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पक्षाला गळती लागल्याचा टोलाही पवार यांनी हाणला.
लोकसभा निवडणुकीत गतवेळच्या तुलनेत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला. देश पातळीवर आढावा घेतल्यास आजच्या घडीला भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तिसऱ्या क्रमांकासाठी जयललिता किंवा ममता बॅनर्जी यांच्यात स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर राखला पाहिजे ही आपली अजूनही भावना आहे. मात्र, याचा अर्थ आम्ही मोदी किंवा भाजपला पाठिंबा देणार हा होत नाही. यूपीएला सत्ता स्थापण्याएवढे संख्याबळ नसल्यास विरोधी बाकांवर बसू. सत्ता स्थापण्यासाठी भाजप किंवा मोदी यांना कदापिही पाठिंबा देणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. मोदी यांची विचारसरणी केव्हाही राष्ट्रवादीला मान्य नाही. पंतप्रधान कोण होईल हा अंदाज आताच वर्तविता येणार नाही. प्रादेशिक पक्षांची भूमिका सरकार स्थापण्यात महत्त्वाची ठरेल, असे मतही पवार यांनी मांडले.
विधानसभेत काँग्रेससोबतच राहणार
राज्य विधानसभेची आगामी निवडणूक ही काँग्रेससोबतच लढवू व केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनसेचे राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत दुर्लक्षून चालणार नाही. कारण गेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला प्रत्येक मतदारसंघात लाख-दीड लाखांच्या आसपास मते मिळाली होती. यंदा मनसेचा प्रभाव नाही, असे बोलले जात असले तरी या पक्षाने स्वत:ची अशी मतपेढी तयार केली. ही मते हमखास मनसेला मिळतील. शिवसेनाप्रमुखांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणले. आताच्या नेतृत्वात तसे काही दिसत नाही. मोठय़ा प्रमाणावर लोक पक्ष सोडून जात आहेत. हे असे का झाले, याचा शिवसेना नेतृत्वाने विचार करायला पाहिजे, असा सल्लाही पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.