रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले. उदय सामंतांबरोबरच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांच्या भेटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…
काय म्हणाले शरद पवार?
“बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, अशी आमची तक्रार होती. त्याबाबत आज उदय सामंत यांनी माहिती दिली. अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं ते म्हणाले. तसेच बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील मातीचे परीक्षण केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर मी त्यांना हे काम सध्या हे थांबवून विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी उद्या बारसूमध्ये यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले”, प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
बारसूबाबत स्पष्ट केली भूमिका काय
यावेळी त्यांना बारसू रिफायनरीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं असता, “एखादा महत्त्वाचा प्रकल्प कोकणात होत असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर सरकारने स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भू्मिका आहे. अशा विरोधाची नोंद राज्य सरकारने घ्यायलाच हवी, सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असे ते म्हणाले.
ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरही केलं भाष्य
दरम्यान, बारसू येथील प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी वेगवेगळी भूमिका बघायला मिळाली. याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं. “आमची ठाकरे गटाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. उद्या यासंदर्भात बारसू येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर आनंदच आहे. मात्र, यावर तोडगा नाही निघाला, तर यावर चर्चा करता येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.