मुंबई : आज  विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आहे. विविध आजारांसाठी लशींची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची निवड या पुरस्कारासाठी केली याचा मला अभिमान असून हा विज्ञानाचा सन्मान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळय़ामध्ये ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ‘सीरम इन्स्टिटय़ूट’च्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डॉ. उमेश शालीग्राम, खासदार सुप्रिया सुळे, निवृत सनदी अधिकारी शरद काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक अंबरीश मिश्र यांनी केले.

‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२१’साठी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची निवड झाली. शदर पवारांच्या हस्ते ‘सीरम’चे डॉ. शालीग्राम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पारितोषिक केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या माजी सचिव रेणू स्वरुप यांना मिळाल्याचे डॉ. काकोडकर यांनी जाहीर केले.

‘सीरम’चा जन्म झाला तेव्हापासून या संस्थेसोबत माझा संपर्क आहे. पुनावाला यांनी अतिशय लहान जागेत संस्थेची सुरुवात केली. त्यांच्या वडिलांचे पुण्यात फर्निचरचे दुकान होते. त्यांचा संशोधनाशी काहीही संबंध नव्हता. पण एखादे काम हातात घेतल्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा स्वभाव होता. आज जागतिक पातळीवर अशा पद्धतीचे काम करणारी एकही संस्था नाही. आज जगभरात पाच बालकांना दिल्या जाणाऱ्या लशींपैकी तीन लशीची निर्मिती ‘सीरम’ने केलेली आहे. व्यक्तीच्या कर्तृत्त्वाचे मोजमाप आपण करत नाही, त्याचे उदाहरण म्हणजे सायरस पुनावाला.  त्यांना पद्मश्री मिळाला, मला पद्मभूषण मिळाला. खरेतर माझ्यापेक्षा त्यांचे कर्तृत्त्व निश्चित अधिक आहे. त्यामुळे खूप वेळेला भारत सरकारच्या पातळीवर निर्णय घेण्यात आम्ही कमी पडतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुनावाल आणि सीरम इन्स्टिटय़ूट. पण पुनावाला या गोष्टीचा विचार करत नाहीत, ते आपले काम करत असतात, अशा शब्दांत पवार यांनी पुनावाला यांची प्रशंसा केली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुनावाला यांनी स्वत: न येता ४० जणांचा चमू पाठवला. हे काम एका व्यक्तीचे नसून चमूचे आहे आणि पुरस्काराचे मानकरी ते आहेत ही जाणीव पुनावाला यांनी ठेवली यातच त्यांचे मोठेपण आहे. सीरममुळे आपले जनजीवन पूर्वपदावर येत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

करोना औषधनिर्मितीचा प्रयत्न : डॉ. शालीग्राम

करोना काळात लशीची निर्मिती करणे अधिक आव्हानात्मक होते. लशीसाठी आवश्यक माहिती किंवा अन्य स्रोत मिळविण्यासाठी बाहेर जाण्यावर बंधने होती. उपलब्ध स्त्रोतांमध्ये लवकरात लवकर या लशीची निर्मिती करण्यासाठी डॉ. सायरस पुनावाला यांनी आमच्या चमूला नेहमी प्रोत्साहन दिले. यामुळेच सीरमने आत्तापर्यंत १२७ कोटी मात्रांची निर्मिती केली, तर भारतासह ९७ देशांना लस पुरविली, असे सीरमचे डॉ. उमेश शालीग्राम यांनी सांगितले.  सीरम दरवर्षी विविध प्रकारच्या १६० कोटी लशींच्या मात्रा परदेशात पुरविते. करोना काळातही सीरमने या लशीदेखील पुरविल्या. करोनाच्या पाच लशींची निर्मिती सीरमने केली आहे. करोना औषधाच्या निर्मितीतही पुढाकार घेतल्याची माहिती डॉ. शालीग्राम यांनी दिली.

एक काळ असा होता जेव्हा करोनाने सर्वाना घेरले होते आणि विकसित देश लशींची निर्मिती करून यातून बाहेर पडतील, पण आपले काय अशी भीती आपल्याला वाटत होती. परंतु सीरमच्या या कार्यामुळे आज आपल्याकडेही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण होऊ शकले आणि जगभरात सगळय़ात चांगली स्थिती सध्या भारतात आहे.

डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रज्ञ 

Story img Loader