राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांपासून सर्वच जण अडचणीत आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान साखरेच्या प्रश्नावर शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन साखर उत्पादकांच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडतील.
साखर उत्पादनासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही पाठवले होते. यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्राने मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली. ६० टक्के साखरेवर सेस लावून रक्कम उत्पादकांनी द्यावी तसेच पेट्रोलप्रमाणे इथेनॉलचे दरही वाढले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. केवळ देशहितासाठी आपण राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली असे पवारांनी सांगितले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्राकांत पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला. धोरणात्मक निर्णय सध्या कोल्हापूर उपकेंद्रातून होतात असे ते म्हणाले.