पक्षाच्या विविध मंत्र्यांवर विविध आरोप झाले आहेत वा होत आहेत. लालूप्रसाद यादव यांचे काय झाले हे लक्षात घेता यापुढील काळात तरी सर्व मंत्र्यांनी परिणामांचा विचार करून सावधतेने काम करावे, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांना बुधवारी चांगलेच सुनावले.
पक्षाचे मंत्री आणि काही पदाधिकारी यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. शरद पवार, प्रफुल्ल पटेल या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्र्यांना कारभार सुधारा, असा सूचक इशाराच देण्यात आला. पक्षाचे मंत्री व नेत्यांवर विरोधकांकडून खोटेनाटे आरोप केले जातात. त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतात. निवडणुका जवळ आल्याने विरोधकांकडून नव्याने आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सारेच राजकीय पक्ष सावध झाले आहेत. आता वेळ कमी आहे. अशा वेळी जनतेच्या हिताचे निर्णय लवकर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पवार यांनी काम करताना सावधता बाळगा, असेही बजावले.
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव देवकर या पक्षाच्या मंत्र्यांवर विविध आरोप झाले. या पाश्र्वभूमीवर पवार यांनी दिलेला इशारा हा महत्त्वाचा ठरतो. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी कायम राहणार असून, या संदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील चारा घोटाळ्यात ४५ जणांना तुरुंगात जावे लागले. यातील काही जणांनी फक्त पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तेव्हा पक्षाच्या मंत्र्यांनी निर्णय घेताना किंवा कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करताना अधिक सावध झाले पाहिजे, यावरही पवार यांनी भर दिल्याचे समजते.

Story img Loader