दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत आपली राजकीय कारकीर्द घडवणारे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि यंशवतरावांची राजकीय वाटचाल जवळून पाहणारे काही निवडक ज्येष्ठ पत्रकार यांनी रविवारी एका हृद्य स्नेहसंमेलनात यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पदरही उलगडत नेले.. निमित्त होते, यशवंतरावांच्या २८ व्या पुण्यतिथीचे!
यशवंतरावाच्या काळात पत्रकारितेत असलेल्या जेष्ठ पत्रकारांसोबत पवार यांनी आज अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडिलकर यांच्यासह प्रकाश जोशी, अंबरिश मिश्र, सुकृत खांडेकर, कुमार कदम, दिलीप चावरे, वसंत नाईक, अरिवद कुलकर्णी आदी जेष्ठ पत्रकार गप्पात सहभागी झाले होते.
आपण आज जे कोणी आहोत, जे काही घडलो त्याचे त्याचे सारे श्रेय यशवंतरावाना जाते. यशवंतरावांचा सहवास हा मोठा ठेवा असल्याचे सांगत पवार यांनी यशवंतरावांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयात सरचिटणीस असताना यशवंतराव मुख्यमंत्री होते. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. त्यांच्यासमोर मी प्रथमच प्रास्तविक भाषण केले. या भाषणाने प्रभावित झालेल्या यशंवतरावानी कार्यक्रम संपल्यानंतर माझी चौकशी केली आणि व्यापक क्षेश्रात काम करीत रहा असा मौलिक सल्ला दिला. त्यानंतर एकदा बारामतीला आले असताना यशवंतरावानी माझ्या आईला, तुम्हाला सात मुले आहेत, शरदला माझ्याकडे सोपवा अशी मागणी केली. त्याला राजकारणात रस असेल तर माझी हरकत नाही, असे आईनेही सांगितले. त्यानंतर त्यांनी मला मुंबईत बोलावून घेतले आणि टिळक भवनात राहण्याची सोयही केली. तेव्हापासून मी यंशवंतरावाच्या सोबत काम सुरू केले.
यशवंतरावांनी अनेकांच्या ओळखी करून दिल्या, लोकांशी संवाद साधण्याची संधी दिली. त्यानुसार मी अनेकांशी चर्चा करून माहिती घेत होतो. नव्या पिढीने लोकांशी संवाद साधला पाहिजे असा यशवंतरावांचा आग्रह असे. १९६६ला आपल्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली तीही यशवंतरावांमुळेच असे सांगताना पवार जुन्या आठवणींमध्ये रमले. संयुक्त राष्ट्रांची शिष्यवृत्ती मिळाल्याने मला पक्षाच्या वतीने कॅनडा, जपान आणि इंग्लड या देशांच्या अभ्यास दैारा करण्याची संधी मिळाली. पंतप्रधांनाचा कारभार कसा चालतो, त्यांची भाषणे कशी तयार केली जातात याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, त्याचा आजही उपयोग होतो, अशा अनेक आठवणी पवार यांनी यावेळी सांगितल्या. तर यशवंतराव हे समंजस आणि सुसंस्कृत नेतृत्व होते. तसे नेतृत्व राज्या पुन्हा उदयास यावे अशी अपेक्षा खाडिलकर यांनी व्यक्त केली.
भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या आईने वर्तमानपत्रात वाचकांच्या पत्राच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेची दखल घेऊन चव्हाण यांनी त्या माहिलेला निवृत्ती वेतन मिळण्याची तजवीज केल्याची आठवण प्रकाश जोशी यांनी सांगितली. अन्य पत्रकारांनीही आपल्या आठवणींना उजळा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा