|| संतोष प्रधान
दिल्लीतील निवासस्थान हालचालींचे केंद्रबिंदू
शरद पवार यांचे ६, जनपथ हे नवी दिल्लीतील निवासस्थान.. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे परस्परांच्या नजरेला नजर न भिडवणाऱ्या नेत्यांचे एकत्र येणे, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, फारुक अब्दुल्ला आदी विरोधी नेत्यांची तेथील हजेरी.. ही सारी किमया घडवून आणली ती पवारांनी. विरोधी नेत्यांमध्ये समन्वयकाची भूमिका ते बजावीत आहेत. देशाचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने पवारांची ही पेरणी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरीही विरोधकांची एकत्र येण्याबाबतची कोंडी फुटलेली नाही. काँग्रेसचे नेतृत्व मान्य करण्यास प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली असली तरी काँग्रेस त्यांना महत्त्व देण्यास तयार नाही. या गोंधळात सर्व विरोधी नेत्यांनी पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. गेले दोन-तीन दिवस दिल्लीतील विरोधी नेत्यांच्या बैठकांचे केंद्रबिंदू पवारांचे निवासस्थान होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राहुल आणि केजरीवाल उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी आंध्रला विशेष दर्जा मिळावा म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी राजधानीत आंदोलन केले. ते संपल्यावर चंद्राबाबू थेट पवारांच्या भेटीला गेले होते. डाव्या पक्षांच्या नेत्यांचे पवारांशी उत्तम संबंध आहेत. माजी पंतप्रधान देवेगौडा हे पवारांच्या शब्दाबाहेर नाहीत. मायावतींशी पवारांचे चांगले संबंध आहेत. सारे विरोधी नेते पवारांचा आदर करतात.
विरोधकांच्या आघाडीच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडविली असली, तरी विरोधी आघाडी आकारास आल्यास भाजपपुढे आव्हान उभे राहू शकते. निकालानंतर कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसेल तर १९९६ प्रमाणे छोटय़ा पक्षांना महत्त्व येऊ शकते. तसेच सर्वमान्य होणारे नेतृत्व पंतप्रधानपदासाठी स्वीकारले जाऊ शकते.
२७२चा आकडा जो जुळवू शकतो त्याच्याकडे नेतृत्व जाऊ शकते. या दृष्टीने पवारांचे नेतृत्व काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, बसपा, चंद्राबाबू किंवा ममता बॅनर्जी मान्य करू शकतात. हे गणित लक्षात घेऊनच राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भर देणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये पवारांविषयी आदर आहे. यामुळेच त्यांचे दिल्लीतील निवासस्थान विरोधी नेत्यांसाठी हक्काचे केंद्र बनले आहे. विरोधी नेत्यांना एकत्र आणण्यात पवार महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. – प्रफुल्ल पटेल, सरचिटणीस, राष्ट्रवादी