‘सहस्रभोजना’वरून खरडपट्टी काढली
सार्वजनिक जीवनात काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. खोटय़ा प्रतिष्ठेचा आव आणण्यापेक्षा सरळ वेगळ्या क्षेत्राचा विचार करावा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची चांगलीच कानउघाडणी केली. राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असताना मुलांच्या विवाहाचा शाही थाट घालून उधळपट्टी करणाऱ्या आणि ‘आपण करू तेच खरे’ या थाटात वावरणाऱ्या जाधव यांना पवार यांच्या खरडपट्टीनंतर सपशेल माफी मागण्याशिवाय पर्याय उरला नाही.
जाधव यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या विवाहानिमित्त चिपळूणमध्ये शाही थाट घालण्यात आला होता. स्वागत समारंभासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर जाधव यांनी केलेल्या संपत्तीच्या दर्शनाची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाधव यांना चांगलेच फटकारले. बुधवारी विवाहाची दृश्ये वृत्तवाहिन्यांवर बधितल्यावर आपल्याला रात्री झोप येत नव्हती. एकीकडे राज्यात दुष्काळामुळे जनता हवालदिल झाली असताना शाही विवाह करणे हेच मुळी चुकीचे आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी हे टाळायला पाहिजे. आपल्या कन्येच्या विवाहासाठी बारामतीमध्ये दोन लाख लोक आले होते. मोठय़ा मैदानात फक्त व्यासपीठ बांधले होते. आलेल्या प्रत्येकाला फक्त लाडू देण्यात आला. राष्ट्रवादीतील आपल्या सर्वच सहकाऱ्यांनी साधेपणाने समारंभ साजरे करावेत, असे आपले साऱ्यांना आवाहन असल्याचेही पवार म्हणाले. राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी काहीही केले तरी पक्षाचा त्यांना पाठिंबा मिळायचा, असे चित्र निर्माण झाले होते. गेल्या वर्षी चिपळूण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात जाधव यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले होते. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षापदावरून जाधव यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. जाधव यांनी विधिमंडळात मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार बऱ्याच वेळा झाले. तरीही राष्ट्रवादीचे नेते जाधव यांच्या विरोधात काहीच कारवाई करीत नव्हते. शाही विवाहावरून पवार यांनी फटकारताच जाधव यांना उपरती झाली आणि माझ्याकडून अनवधानाने चूक झाली, अशी दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा