उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळेंची गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीत मुंबई क्रिकेट गट, म्हाडदळकर गट आणि शरद पवार-आशीष शेलार पवार गट रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती. अखेर पवार-शेलार गटाने वर्चस्व राखले. या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि भाजपाचे नेते आशीष शेलार यांच्या गटाची युती दिसून आली. याच युतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मोठं भाकित व्यक्त केलं आहे. २०२४ च्या निवडणुकीमध्ये शरद पवार मोदींना साथ देतील असं आठवले म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार गटातून निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही, उमेदवारी…”

एमसीएचे सदस्य असणाऱ्या आठवले यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये शेलार आणि फडणवीसांच्या निकटवर्तीयांशी युती करुन उद्धव ठाकरेंना गुगली टाकत बोल्ड केल्याचं विधान केलं आहे. “शरद पवारांनी जी गुगली टाकली आहे त्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तुम्ही जुने राजकारणी आहात. काय वाटतं तुम्हाला याबद्दल?” असा प्रश्न आठवलेंना ‘टीव्ही ९ मराठी’वरील मुलाखतीत विचारण्यात आला. यावर आठवलेंनी, “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. त्यांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे, “शरद पवार हे कधी गुगली टाकतील सांगता येत नाही. त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बोल्ड करणारी आहे,” असंही आठवले म्हणाले.

“फ्रेण्डली मॅच खेळणारे हे नेते भविष्यातही अशी फ्रेण्डली मॅच खेळतील असं वाटतं का?” असा प्रश्न विचारला असता आठवलेंनी, “अशी फ्रेण्डली मॅच ते भविष्यात खेळू शकतात. शरद पवार यांनी निर्णय घेतला तर अशी फ्रेण्डली मॅच होऊ शकते,” असं सूचक विधान केलं. तसेच, “काँग्रेस पक्ष खिळखिळा झालेला आहे. विरोधक अशक्त आहेत. अशावेळेस नरेंद्र मोदींना साथ देणं हेच राजकीय परिपक्वतेचा विचार होऊ शकतो. शरद पवारांनी क्रिकेटमध्ये खेळी केली आहे तशी राजकारणातही खेळतील,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> “कोणीतरी बानकुळेंना उपचारांसाठी…”; ‘घड्याळ बंद पाडू’ टीकेवरुन राष्ट्रवादीचा भाजपा प्रदेशाध्यक्षांना टोला

इतकच नाही तर २०२४ च्या निवडणुकींचा उल्लेख करत शरद पवार मोदींनी साथ देतील असा विश्वास वाटतो असंही आठवले म्हणाले. “२०२४ च्या निवडणुकीमध्ये ते नक्की नरेंद्र मोदींबरोबर येतील असा मला विश्वास आहे कारण त्यांना उद्धव ठाकरेंना क्लीन बोल्ड करायचं होतं आणि त्यांनी या निवडणुकीत ते करुन दाखवलं आहे. पुढील वाटचाल ते एनडीएच्या दिशेने करतील असा मला विश्वास वाटतो,” असंही आठवलेंनी सांगितलं.

Story img Loader