केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून, ते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बंगळुरू, उटी आणि म्हैसूरच्या दौऱयावर असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले.
गेल्या रविवारी कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात अस्वस्थ वाटू लागल्यानंतर शरद पवार तातडीने पुण्यातील त्याच्या निवासस्थानी परतले. शरीररातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर एक दिवस त्यांनी पुण्यामध्ये विश्रांती घेतली आणि त्यानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार कर्नाटकामध्ये गेले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल बुधवारपासून राज्यात अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने हे निवेदन प्रसिद्ध केले आहे.