आंदोलनामुळे दोन दिवस बुडालेले ‘बेस्ट’चे सात कोटी रुपयांचे उत्पन्न वाहक-चालकांच्या वेतनातून वसूल करण्याची आणि ‘दि बीईएसटी वर्कर्स युनियन’ची मान्यता रद्द करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कामावरच गेले नाहीत, मग या दोन दिवसांचे वेतन त्यांना देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका घेत युनियनने कोलांडउडी मारली आहे. संप यशस्वी करण्यासाठी वापरून झाल्यानंतर युनियनने आता वाऱ्यावर सोडल्याने वाहक-चालक प्रचंड संतापले आहेत.
बेस्टला रोज प्रवाशांकडून साडेतीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. तर डिझेल, वाहक-चालकांचे वेतन आदींपोटी पावणेचार कोटी रुपये खर्च येतो. वाहक-चालक दोन दिवस कामावर गैरहजर राहिल्याने बेस्टचे सात कोटी रुपये बुडाले. उत्पन्न भरून काढण्यासाठी वाहक-चालकांचे दोन दिवसांचे वेतन कापण्याचे संकेत बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी गुरुवारी पालिका सभागृहात दिले. वेतन कापण्यात येणार असल्याने वाहक-चालकांच्या पोटात गोळा उठला आहे.
बसगाडय़ा आगाराबाहेर पडल्याच नाहीत. त्यामुळे वाहक-चालकांचे वेतन, डिझेल आदींवरील दोन दिवसांतील सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च वाचला. तसेच कर्मचारी कामावर गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांना या दोन दिवसांचे वेतन मिळण्याचा प्रश्नच नाही, असा दावा युनियनकडून करण्यात आला आहे. युनियनच्या या दाव्यामुळे आंदोलनावर गेलेले चालक-वाहक संतप्त झाले आहेत.
एक व दोन एप्रिल रोजी तब्बल २६ हजार वाहक-चालक कामावर आलेच नाहीत. पडद्यामागे राहून ‘दि बीईएसटी वर्कर्स युनियन’ आंदोलनाची सूत्रे हलवित होती. त्यामुळे या युनियनची मान्यता का रद्द करू नये अशी ‘कारणे द्या’ नोटीस  बजावण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत ही नोटीस युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत युनियनने मौन बाळगले आहे.

Story img Loader