भर पावसाळ्यात मुंबईकरांना समस्यांच्या दरीत लोटणाऱ्या शरद राव यांच्या संपातून तूर्तास तरी मुंबईकरांची सुटका झाली आहे. महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, रिक्षा संघटना आणि फेरीवाले यांना हाताशी धरत सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप स्वत: राव यांनीच पत्रकार परिषद घेऊन मागे घेतला. भर पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणूनच आपण हा संप मागे घेतल्याचा बहाणा शरद राव यांनी केला आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
मुंबई महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, रिक्षा चालक-मालक संघटना, फेरीवाले यांच्या मागण्यांसाठी शरद राव यांनी १७ जूनच्या मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. या चारही क्षेत्रांतील कामगार व स्वयंरोजगारित यांना एकत्र आणल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. रविवारी पावसाने मुंबईला दणका दिल्यानंतर शरद राव यांनी नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले होते. यावर राव यांनी कोणतीही प्रतिक्रिया रविवारी दिली नव्हती.
सोमवारी सकाळी राव यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांची भेट घेतली. या वेळी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरेही उपस्थित होते. या बैठकीत आम्ही राव यांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून कोणतीही मागणी या वेळी मान्य करण्यात आलेली नाही, असे मोरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पालिकेकडून कामगारांना तंबी : कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेल्या संपात महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले तर त्यांचा पगार कापण्यात येईल, अशी तंबी महापालिका प्रशासनाकडून पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. बंदच्या काळात कामगार कामावर गैरहजर राहिल्यास कामगाराचा त्या दिवसांचा पगार कापला जाईल, तसेच या संपामुळे नागरिकांना त्रास होईल, महापालिकेचे नुकसान होईल त्याचा सर्व खर्च संपकरी संघटना आणि कामगारांकडून वसूल केला जाईल, असा इशाराही महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता.

Story img Loader