राष्ट्रीय शहरी फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांना परवाने देण्यात यावेत, सर्व फेरीवाल्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, या मागण्यांसह राज्य सरकारच्या फेरीवालाविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी १ एप्रिलपासून महासंघर्ष पुकारण्यात येणार असल्याची घोषणा ‘मुंबई हॉकर्स युनियन’चे अध्यक्ष शरद राव यांनी केली आहे. मुंबईसह पाच महापालिकांमध्ये बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस आणि पालिका प्रशासनास हाताशी धरून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. फेरीवाल्यांचे सामान जप्त करणे, त्यांना व्यवसाय करण्यास परावृत्त करणे, प्रसंगी मारहाण करणे आदी प्रकार सतत घडत असून पोलीस आणि पालिका प्रशासनास पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या ४ ऑगस्ट २००९च्या लेखी आदेशाचा भंग केला आहे, असा आरोप राव यांनी केला. यापुढे फेरीवाल्यांवर होणारा अन्याय सहन करण्यात येणार नाही. फेरीवाल्यांचे संरक्षण करण्यात यावे, राष्ट्रीय धोरणानुसार फेरीवाला समितीवर किमान ४० टक्के प्रतिनिधी फेरीवाल्यांचेच असावेत, फेरीवाल्यांचा होणारा छळ थांबविण्यात यावा तसेच फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या जागा त्यांना परत कराव्यात, अशा मागण्या राव यांनी केल्या असून, मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद या पालिका क्षेत्रातील फेरीवाले बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
१ एप्रिलपासून फेरीवाल्यांचा ‘महासंघर्ष’
राष्ट्रीय शहरी फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांना परवाने देण्यात यावेत, सर्व फेरीवाल्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, या मागण्यांसह राज्य सरकारच्या फेरीवालाविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी १ एप्रिलपासून महासंघर्ष पुकारण्यात येणार असल्याची घोषणा ‘मुंबई हॉकर्स युनियन’चे अध्यक्ष शरद राव यांनी केली आहे.
First published on: 09-03-2013 at 02:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad rao threatens grand protest on april 1 with hawkers