महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांचं बेमुदत उपोषण आणि राज्यातील एकूण तणावपूर्ण स्थिती यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या एका व्हायरल व्हिडीओचा उल्लेख करत जातीनुसार आरक्षण कायमस्वरुपी असू शकत नाही, असं म्हटलं. त्या गुरुवारी (२ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक व्हिडीओ क्लिप फार व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की, जातीनुसार आरक्षण कायमस्वरुपी असू शकत नाही. कारण तुम्ही एका जातीला आरक्षण दिलं की, दुसरी जात आरक्षणासाठी येते. आत्ताच बघितलं तर मराठ्यांबरोबर धनगरही आरक्षणाची मागणी करत आहेत. मुस्लीम समाजही आंदोलन करत आहे.”

“गरीब प्रत्येक जातीत आणि समाजात असतो”

“गरीब प्रत्येक जातीत आणि समाजात असतो. त्यामुळे आपण माणसांच्या कपाळावर लावलेल्या जातीच्या पट्ट्या काढून जे खरंच गरीब आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या सर्व लोकांना मोफत शिक्षण, मोफत पुस्तकं किंवा इतर शालेय साहित्य दिलं पाहिजे. त्यांना शिक्षण आणि नोकरीत जी गरज आहे त्यात त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे,” असं मत शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येतेय?”; भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

“…त्यामुळे जरांगेंनी आमरण उपोषण करून उपयोग नाही”

महाराष्ट्रात जाळपोळ, आमदारांच्या गाड्या-कार्यालये तोडफोड व जाळण्याचे प्रकार घडले. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना निवेदन दिलं आहे की, त्यांचं आयुष्य फार महत्त्वाचं आहे. जरांगेंनी हे आंदोलन व्यापक केलं. त्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करून उपयोग नाही. त्यांच्या तब्येतीला काही बरंवाईट झालं तर ते चांगलं नाही.”

हेही वाचा : व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर मनोज जरांगे म्हणाले…

“मनोज जरांगेंनी जीवंत राहिलं पाहिजे आणि…”

“मनोज जरांगेंनी जीवंत राहिलं पाहिजे आणि जीवंत राहून त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं पाहिजे. राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय मनोज जरांगेंनीच सांगितलंय की, हिंसक आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे जरांगे हिंसाचाराला प्रोत्साहन देतात असं मला वाटत नाही,” असंही शर्मिला ठाकरेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila raj thackeray comment on manoj jarange maratha reservation pbs