Sharmila Thackeray on Akshay Shinde Encounter: “आज महिलांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे. रोज बलात्कार आणि खूनाच्या बातम्या समोर येत आहेत. राजकारणी, विरोधक आणि न्यायालय काय सांगते, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. मी महिलांची प्रतिनिधी म्हणून मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, पोलिसांनी एन्काऊंटर करून चांगलेच केले”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज दिली. उच्च न्यायालयात अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरविरोधात त्याच्या पालकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच शर्मिला ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आली. शर्मिला ठाकरे यांनी आज अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी झालेल्या पोलीस निलेश मोरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना आपली भूमिका मांडली.
आम्हाला हाच शक्ती कायदा हवा
राज्यात मागच्या चार वर्षांपासून शक्ती कायद्याची केवळ चर्चाच सुरू आहे. आम्हाला पोलिसांनी जे केले, त्याप्रकारचा शक्ती कायदा हवा. महिलांवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळण्यात उशीर झाला तरी पीडितेला न्याय मिळत नाही. बदलापूर प्रकरणात जर चार ते पाच वर्ष केस चालली असती तर आज ज्या पीडिता चिमुकल्या मुली आहेत. त्यांना पाच ते सहा वर्षांनंतर काहीही आठवणार नाही. त्यामुळे अशा प्रकरणात दोन ते तीन महिन्यातच निकाल लागले गेले पाहीजेत, अशीही मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली.
हे वाचा >> अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश…
अशाप्रकारचे एन्काऊंटर हे लोकशाहीला मारक आहेत, असे वाटत नाही का? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला असता महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. आज वेगाने महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. मी मागच्या महिन्यात तीन बलात्कार पीडित महिलांना भेटली आहे. हे लोकशाहीला पूरक आहे का?
विरोधकांचा मुर्खपणा सुरूये…
हैदराबादमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला चार पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. आज जे रोज सकाळी बोंबलतात, त्याच पोलिसांनी आपल्या वर्तमानपत्रात पोलिसांचे कौतुक केले होते. मग हैदराबादच्या पोलिसांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना वेगळा न्याय देऊन कसा चालेला? जर त्यांचे कौतुक होते, तर यांचेही कौतुकच झाले पाहीजे, असा मुद्दा शर्मिला ठाकरे यांनी मांडला.
हे ही वाचा >> “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
अक्षय शिंदे संत नव्हता…
अक्षय शिंदे आरोपी होता. त्या चिमुकल्या मुलींनी त्याला ओळखले आहे. त्याचे पुरावे दिले आहेत, असेही शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या. अक्षय शिंदेच्या पालकांनी त्यांचा मुलगा गमावला, याबद्दल मी त्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकते. पण त्यांच्या मुलाने जे केले? त्यात कुणीही सहभागी होऊ शकत नाही.