महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी (२ एप्रिल) आपल्या मुलांच्याही आधी सर्वप्रथम पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पेढे आणि बर्फी देत त्यांचं तोंड गोड केलं. तसेच यामागील कारणही सांगितलं. यावेळी त्यांनी गुढीपाडव्या निमित्त प्रार्थना करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून एसटी संपापर्यंत अनेक प्रश्नांवर प्रार्थना केली. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आज आनंद असा आहे की आज महाराष्ट्रावरील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. करोनामुक्त महाराष्ट्र झालाय असं म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचं आयुष्य रोगराईमुक्त जावो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बंद होऊन त्यांना सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळू दे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ दे. त्यांना वीज मोफत मिळू दे. सगळ्यांना ‘जो जे वांछिल तो तेलावो’ अशी मी प्रार्थना करते.”

“मागील २ वर्षे महाराष्ट्रानेच नाही तर जगाने फार हालाखित काढले आहेत. तसे दिवस परत येऊ नये. आज आम्हाला आमचे सर्व सैनिक भेटत आहेत याचा आनंद आहे. आम्ही २ वर्षांनी भेटतो आहोत. त्यामुळे आणखी उत्साह आहे. मी दरवर्षी पेढे आणि बर्फी वाटते. मला वाटतं आपण गोड खाऊन आपला दिवस गोड करतो, पण पोलिसांसह हे लोक दिवसभर ८ ते १६ तास त्यांच्या ड्युटी सुरू राहतात. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा गोड दिलं पाहिजे. मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिलंय,” असं शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं.

“मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही”

राज ठाकरे काय बोलतील, तुमच्या काय अपेक्षा आहेत यावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा राजकारणातील त्यांनी खूप कळतं. त्यांना लोकांचे प्रश्न जास्त माहिती असतात. त्यामुळे ते सर्वांबद्दल काहीतरी बोलतील. अमितला देखील मी आई म्हणून सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा त्यांना राजकारणातील जास्त कळतं. अमितचे वडील म्हणून राज ठाकरे त्याला सूचना देतील.”

हेही वाचा : “नितीन गडकरी देशात खूप मोठमोठे प्रकल्प करतात, त्यांनी आता…”, राज ठाकरेंकडून ‘ही’ मागणी

“आम्हाला सभेच्या गर्दीची काळजी नाही”

“राज ठाकरे यांची सभा कायमच रेकॉर्ड ब्रेक होत आली आहे. मी आतापर्यंत कधीच बघितलं नाही की आम्हाला गर्दीची काळजी आहे. उलट करोना काळात बघितलं तर त्यांनी जिथं जिथं शाखा उद्घाटन केलं तेथे निर्बंध असूनही धक्काबुक्की होईल अशी गर्दी होती. त्यामुळे सभेला गर्दीची आम्हाला काळजी नाही,” असंही शर्मिला ठाकरेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila thackeray gives sweet to police staff before family member on gudi padwa pbs