मुंबई : गोवंडी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच काही रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. मात्र रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.

शताब्दी रुग्णालयात दररोज गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर, आणि देवनार परिसरातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परिचारिकांची २४ पदे रिक्त आहेत. तसेच २१० रुग्णशयांसाठी १५० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. एखादा कर्मचारी काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास दुसऱ्या कर्मचाऱ्यांना १६ तांस काम करावे लागत आहे.

हेही वाचा >>>बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस सीईटीचा निकाल जाहीर

पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण रुग्णालयात येवू लागले आहेत. या रुग्णालयात दररोज वैद्यकीय उपचारासाठी येणारे रुग्ण आणि इतर रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र येथे एक – दोन कर्मचारी उपलब्ध असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. महिलांच्या विभागात तीन – चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र केवळ एका कर्मचाऱ्याला तेथील रुग्णांची देखभाल करावी लागत आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवरही होत आहे. परिणामी, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांनापासून रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून महानगरपालिकेने या समस्येची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पत्रात दिला आहे.