११ वर्षांपूर्वी अर्थात २०१२ साली शीना बोरा या २१ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. हाय प्रोफाईल केसमुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या प्रकरणात शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीला विषेश सीबीआय कोर्टानं सहा वर्षं तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर सोडलं होतं. यानंतर इंद्राणी सामाजिक जीवनात पुन्हा कार्यरत झाली असून तिनं या सर्व घटनाक्रमावर एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं केला आहे. तिनं दुसऱ्यांदा हा दावा केला असून यासंदर्भात पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
गेल्या वर्षी १८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर इंद्राणीनं लिहिलेल्या ‘अनब्रोकन: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात शीना बोरासंदर्भात मोठा दावा केला आहे. शीना बोरा जिवंत असून आपली मैत्रीण सवीनानं शीनाला गुवाहाटी विमानतळावर पाहिल्याचं इंद्राणीनं आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
“माझी मैत्रीण सवीनानं शीनाला गुवाहाटी विमानतळावर पाहिल्यानंतर आता मला शांती मिळाली आहे. ती स्वत: एक वकील आहे. त्यामुळे तिच्या प्रसंगावधानामुळे आम्हाला विमानतळावरील सीसीटीव्ही फूटेजही मिळालं आहे”, असा दावा इंद्राणीनं आपल्या पुस्तकात केल्याचं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
शीनाला भायखळा तुरुंगातल्या कैद्यानंही पाहिलं होतं?
दरम्यान, याआधीही तुरुंगात असताना इंद्राणी मुखर्जीनं शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भातही तिनं पुस्तकात उल्लेख केला आहे. “मी जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा भायखळा जेलमधल्या एका कैद्यानंही शीनाला काश्मीरमध्ये पाहिल्याचा दावा केला होता. ती एक सरकारी अधिकारी होती. मी माझी वकील सना (रईस खान)करवी सीबीआयला यासंदर्भात तपास करण्याची विनंती केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. पण आता सवीनानं तिला स्वत: पाहिलं आहे”, असा दावा इंद्राणीनं आपल्या पुस्तकात केला आहे.
हे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयानं दिल्यासंदर्भात इंद्राणी पुस्तकात म्हणते, “विशेष सीबीआय न्यायमूर्ती एस. पी. नाईक निंबाळकरांनी विचारलं की सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात नुकसान काय आहे? त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला ५ जानेवारी २०२३ रोजीचं गुवाहाटी विमानतळावरचं सकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यानचं सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत”, असा उल्लेख इंद्राणीनं पुस्तकात केला आहे.
“दुर्दैवाने ते सगळं अल्पजीवी ठरलं!”
“शीना कशी आहे हे मी ती १५ वर्षांची झाल्यानंतरच समजू शकले. सुरुवातीपासूनच आमच्यात मैत्रीचं नातं होतं. शीना माझ्या आई-वडिलांकडेच लहानाची मोठी झाली. त्यामुळे ती त्यांना तिचे पालकच समजायची. ती मला तिची बहीणच मानायची. वर्षं सरली तसं आमच्यातलं मैत्रीचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. आम्ही सर्वकाही एकमेकींशी शेअर करायचो. अन्न, दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत. पण ते सर्व अल्पजीवी ठरलं”, असंही इंद्राणी मुखर्जीनं पुस्तकात म्हटलं आहे.
“…आणि सगळं बदललं”
दरम्यान, आपण शिस्तीनं वागायला सुरुवात करताच सगळं बदलल्याचं इंद्राणीनं या पुस्तकात म्हटलं आहे. “एका २१ वर्षीय मुलीचं पालकत्व पार पाडण्यात काय आव्हानं असतात, याची मला कल्पनाच नव्हती. ज्या क्षणी मी कूल वागणं सोडून शिस्तीनं वागायला सुरुवात केली, त्या क्षणी सगळं बदललं”, असं इंद्राणीनं पुस्तकात म्हटलं आहे.