शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची बुधवारी तब्बल १२ तास चौकशी केली. त्यांना गुरुवारीही पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आल्यामुळे ते सकाळीच खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. पीटर मुखर्जी यांची एवढ्यावेळ चौकशी करण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुंबई पोलीसांनी पीटर मुखर्जी यांना बुधवारी खार पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यामुळे सकाळी साडेदहाच्या सुमारास ते तिथे दाखल झाले. दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. पोलीसांचे एक पथक त्यांची चौकशी करीत असताना दुसरे पथक त्यांच्या निवासस्थानी शोधकार्यात गुंतले होते. पोलीसांनी त्यांचा लॅपटॉप आणि इतर काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. पोलीस ठाण्यात पीटर मुखर्जींसोबत त्यांचा मोठा भाऊ गौतम मुखर्जीही उपस्थित होता. यावेळी या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचे वकीलही पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
पोलीसांनी गेल्या आठवड्यात पीटर मुखर्जी यांचा प्राथमिक जबाब नोंदविला होता. मात्र, सविस्तर माहिती घेण्याचे काम बाकी होते. त्यासाठीच त्यांना बुधवारी पुन्हा एकदा खार पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात आली. त्यांच्याकडून एक प्रश्नावलीही भरून घेण्यात आली.
शीना बोराची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी २४ ऑगस्ट रोजी इंद्राणी मुखर्जीला अटक केली. याप्रकरणी तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांनाही पोलीसांनी अटक केली आहे. या सर्वांना वांद्रे न्यायालयाने पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा हिच्या हत्येत सामील असल्याचा आपला गुन्हा कबूल केला आहे. तिच्या कबुलीजबाबामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Story img Loader