शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तिन्ही आरोपींची तुरुंगात चौकशी करण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) मागणी न्यायालायने मंजूर केली आहे. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय यांची १९ ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात जाऊन चौकशी करू शकणार आहेत.
तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे ते सध्या मुंबईतील तुरुंगात आहेत. इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय या तिन्ही आरोपींच्या तीन आठवड्यांच्या चौकशीची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी १९ ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी परवानगी देण्यात आली. इंद्राणी आणि संजीव खन्ना यांच्या वकिलांनी सीबीआय चौकशीला सहमती दर्शविली होती. जर न्यायालयाने परवानगी नाकारली असती, तर मुंबई पोलीसांच्या तपासणी अहवालाच्या आधारे सीबीआयला पुढील तपास करावा लागला असता.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या इंद्राणी मुखर्जीला मंगळवारी पुन्हा भायखळा येथील तुरुंगात पाठविण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा