सीबीआयच्या रिमांड अर्जात दावा
केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल याच्याशी असलेल्या संबंधामुळेच शीनाची हत्या करण्यात आल्याचा दावाही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या रिमांड अर्जात करण्यात आला आहे. पीटरचा मुलगा राहुल आणि इंद्राणीची मुलगी शीना हे सावत्र बहीण-भाऊ असल्यामुळे त्यांचे संबंध या दोघांनाही मान्य नव्हते. तेही एक कारण असू शकते, असेही त्यात नमूद आहे.
महानगर दंडाधिकारी महेश नातू यांनी शीना हत्येमागील या दोन्ही कारणांचा आपल्या आदेशात उल्लेख केला आहे. पीटर मुखर्जीच्या कोठडीत वाढ करण्यासाठी सादर केलेल्या रिमांड अर्जातील हे मुद्देही नातू यांनी नमूद केले आहेत.
हत्येच्या दिवशी इंद्राणीसोबत वारंवार झालेल्या संभाषणाबाबत पीटर समाधानकारक माहिती देत नसल्यामुळेच त्याची कोठडी वाढवून घेण्यात आली आहे. त्याच्यावर लाय डिटेक्टर चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला दिल्ली येथे नेण्यात आले आहे. दिल्लीत त्याच्यावर ही चाचणी केली जाणार असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. त्याच्या कोठडीची मुदत गुरुवारी संपत आहे.
दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खार पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनाही साक्षीदार केले आहे. या अधिकाऱ्यांची जबानी नोंदविण्याचे काम सुरू आहे.

पीटर मुखर्जीची दिल्लीत न्यायवैद्यक चाचणी

नवी दिल्ली : सावत्र मुलगी शीना बोरा हिची हत्या झाल्याच्या प्रकरणात माजी माध्यम उद्योजक पीटर मुखर्जी यांना न्यायवैद्यक चाचण्या करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथे आणले आहे.
विशेष कामगिरी दलाच्या अधिकाऱ्यांनी मुखर्जी यांना कडक सुरक्षेत आज सकाळी मुंबईहून येथे आणण्यात आले.
मुखर्जी यांची पुढील चौकशी दिल्लीत करण्यामागे काय कारण असावे हे सांगण्यात आले नाही. सीबीआयने त्यांच्या काही चाचण्या करण्याचे ठरवले असावे त्यामुळे त्यांना दिल्लीत आणले गेले आहे. त्यांच्यावर लाय डिटेक्षन, ब्रेन मॅपिंग या चाचण्या करण्यात येऊ शकतात. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या चाचण्या करण्यात येतील. मुंबईत सीबीआयची वैज्ञानिक साहाय्य शाखा आहे तेथे पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते, पण तेथील सुविधांबाबत सीबीआय समाधानी नसावे. शीना बोरा ही इंद्राणी यांची आधीच्या विवाहातून झालेली मुलगी होती. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी व तिचा आधीचा पती संजीव खन्ना व माजी वाहन चालक श्यामवर राय यांच्यावर सीबीआयने खुनाचा आरोप ठेवला असून २०१२ मध्ये शीनाचा खून झाला होता. पीटर याला १९ नोव्हेंबरला अटक केल्यानंतर मुंबईच्या विशेष न्यायालयाने २६ नोव्हेंबपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. सीबीआयने असा दावा केला आहे की, शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते त्यातून शीनाची हत्या करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा