शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी संजीव खन्ना याला मंगळवारी वांद्रे न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या खटल्यातील अन्य प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा वाहनचालक श्याम राय यांना सोमवारीच न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
संजीव खन्ना याला पोलीसांनी बेकायदा अटक केली असून, त्याला तातडीने सोडून द्यावे, असा अर्ज संजीव खन्नाचे वकील श्रेयंश मिठारे यांनी न्यायालयाकडे केला आहे. संजीव खन्ना याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारीच संपली होती. त्यामुळे पोलीसांनी त्याला कालच न्यायालयापुढे हजर करायला हवे होते. मात्र, तसे न करता पोलीस त्याला कोलकात्याला घेऊन गेले. हे एकप्रकारे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे संजीव खन्ना याला पोलीसांच्या ताब्यात ठेवणे बेकायदा ठरते, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायाधीश जी. आर. तौर यांनी खार पोलीसांकडून याप्रकरणी अहवाल मागविला. तो आल्यावर १० सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शीना बोरा हत्या : संजीव खन्नाला न्यायालयीन कोठडी
इंद्राणी मुखर्जी, श्याम राय यांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 08-09-2015 at 16:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheena case khanna remanded in judicial custody till sept