शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी पाच सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर पोलीस कोठडी वाढविण्याचा निर्णय दिला.
इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३२८ नुसार विष पाजून मृत्यूस कारणीभूत ठरणे हा गुन्हाही पोलीसांनी तिघांविरोधात नोंदविला आहे. त्याचबरोबर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. आम्हाला संजीव खन्ना यांचा पासपोर्टही जप्त करायचा आहे. अत्यंत थंड डोक्याने केलेले हे कृत्य आहे. हत्येसाठी वापरलेली गाडी जप्त करायची आहे. त्याचबरोबर रायगडमध्येही तपास करायचा आहे, असे पोलीसांनी न्यायालयात सांगतले.
दुसरीकडे इंद्राणी मुखर्जी यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. इंद्राणी मुखर्जीला एकांतात भेटू दिले जात नाही. यापूर्वी ९० तास चौकशी झाली आहे. पुन्हा चौकशीची गरज काय, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. पोलीसांपेक्षा माध्यम प्रतिनिधींना जास्त माहिती आहे. पोलीस गंभीर गुन्हा घडल्याचा बनाव रचत आहेत, असाही आरोप वकिलांनी केला. न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच इंद्राणीला चक्कर आली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
शीना बोरा हत्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, रविवारी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्य़ाचा घटनाक्रम उलगडला. शनिवारी रात्रीही आरोपींची कसून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पेणमधील गोगादे खुर्द गावात रविवारी सकाळी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले.
वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयासमोरून २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाचे अपहरण करण्यात आले. यासाठी किती वेळ लागला ते अंतरही नोंदविण्यात आले. आरोपींना घटनास्थळावर नेऊन त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मृतदेह फेकला होता. त्या जागेची माहिती घेण्यात आली. कुठल्या मार्गाने प्रवास केला, कुठे थांबले, त्याचेही तपशील नोंदविण्यात आले. शीनाची हत्या करण्याचे नक्की झाल्यानंतर तिला नेमके कसे मारायचे, याचा विचार सुरू झाला. तिला मारून ती अमेरिकेत गेली, असे भासवायचे होते. तिचा खून करून मृतहेह पंख्याला लटकवायचा आणि तिचा प्रियकर राहुलला त्यात अडकवायचा अशी एक योजना होती. तर सुपारी देऊन तिची हत्या करण्याबाबतही विचार सुरू होता, परंतु त्या काळात चित्रपट निर्माते करण कक्कर याचे हत्या प्रकरण गाजले होते. विजय पालांडे याने कक्करचे अपहरण करून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सातारा-गोवा महामार्गावरील कुंभार्ली घाटात टाकून दिले होते. इंद्राणीला हा पर्याय जास्त सोपा वाटला. या घटनेचा तिने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे ही अंतिम योजना बनवली. गाडीत हत्या केली तर मृतदेह हाती लागणार नाही व ती बेपत्ता असण्याची तक्रार करणार नसल्याने तिला कुणी शोधणारही नाही, असा तिचा कयास होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा