सोमवारपासून मंत्रालय-पनवेल मार्गावर पूर्व मुक्तमार्गावरून जाणारी वातानुकूलित सेवा सुरू होत असून लोकांना ‘शीतल’ प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा सुरू होण्याआधीच प्रवाशांच्या आग्रहास्तव या सेवेला वाशी गाव आणि कामोठे येथे जादा थांबे देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळातर्फे पनवेल-मंत्रालय या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या साधारण बसच्या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. पनवेल व मंत्रालय येथून गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या एसटीच्या दोन्ही फेऱ्या पूर्ण भरून जात आहेत. या प्रतिसादाचा लाभ घेण्यासाठी एसटीने या मार्गावर वातानुकूलित ‘शीतल’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही सेवा सोमवारपासून सुरू होत आहे.
विशेष म्हणजे एसटीच्या फेसबुकच्या पृष्ठावरही या नव्या सेवेबाबत माहिती देण्यात आली. या पृष्ठावर प्रवाशांकडून मागवण्यात आलेल्या सूचनांमध्ये या फेरीला कामोठे आणि वाशी गाव येथेही थांबा देण्यात यावा, अशी सूचना होती. त्यामुळे या सेवेला कामोठे आणि वाशी गाव येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी पनवेलहून निघाल्यानंतर कामोठे, खारघर, कोकण भवन, नेरूळ, वाशी, वाशी गाव या थांब्यांवर थांबेल.

Story img Loader