लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील चित्रफीत बदलून ती प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असताना आता प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत करणाऱ्या राजेश गुप्ता यालाही समता नगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चित्रफीतीवरून गेल्या काही तासांपासून राजकारण तापले आहे . या प्रकरणात शितल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली. मात्र या तिघांविरोधात आता बोरिवलीचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करून दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे.

आणखी वाचा- शीतल म्हात्रेंचा आमदार सुर्वेंबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; राष्ट्रवादी प्रवक्ते म्हणाले, “सुप्रिया सुळेंचा…”

या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात कलम ५००,३४ भादविसह कलम ६७(अ),६७ माहिती तंत्रज्ञान अधिकार २००० अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय कांदिवली पूर्व येथील राजेश गुप्ता(३८) यांनी ही चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारीत केली होती. शिंदे गटाच्या वॉर्ड क्रमांक २७ च्या महिला शाखाप्रमुख संगिता शिंगाडे व कार्यकर्त्या त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेल्या असता त्यांनी शिवीगाळ केली. शिंगाडे यांच्या तक्रारीवरून धमकावणे व बदनामी केल्यासह माहिती तंत्रज्ञान कायदयांतर्गत समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गुप्ताला अटक करण्यात आली आहे.