शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एसआरच्या सोसायटीतले गाळे बळकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल होणं हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जातो आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी ही माहिती दिली आहे. अशात आता किशोरी पेडणेकर यांना शीतल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. कचोरी ताई आता काय करणार? असा खोचक प्रश्न शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे.
शीतल म्हात्रे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी पोस्ट करून त्यापुढे एक ओळ लिहित हा खोचक प्रश्न विचारला आहे. त्यामुळे यावर आता किशोरी पेडणेकर काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण शीतल म्हात्रे यांनी आपल्या प्रश्नात किशोरी पेडणेकरांचा उल्लेख कचोरीताई असा केला आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यावर काय आरोप आहे?
किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्याचा आरोप आहे. या सदनिका वर्षानुर्षे पेडणेकर त्यांच्या ताब्यात आहेत, असा दावा केला जातो. तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे. “दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप केला जातोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, सत्य सर्वांना कळेलं. आग नाही पण धूर काढण्याची पद्धत यांनी अवलंबली आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह गेल्यानंतर गेल्यानंतर सगळे आरोप थांबले आहेत. त्यामुळे लोकांना सगळं माहिती आहे, असे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी याआधी दिलेले आहे.
महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड करत उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. तसंच शिवसेनेवरही एकनाथ शिंदे यांनीच दावा सांगितला आहे. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या शीतल म्हात्रे या नंतर शिंदे गटात गेल्या आहेत. त्या शिंदे गटात गेल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्यावर कचोरीताई असा उल्लेख करत शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणकर यांचा उल्लेख कचोरीताई असा केला आहे. यावर किशोरी पेडणेकर काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.