शनिवारी ( ११ मार्च ) अशोकवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमातील रॅलीमधला शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. पण, हा व्हिडीओ ‘मॉर्फ’ केल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या, “व्हायरल व्हिडीओ संदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अंधेरीतील ठाकरे गटाचा उपविभाग प्रमुख आणि युवासेनेच्या शाखाप्रमुखाचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून या गोष्टी व्हायरल करण्यासाठी फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज करण्यात येत होते. पण, एखाद्या महिलेचा व्हिडीओ काढून तुमचा पक्ष मोठा होणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार तुम्ही विसरले आहात.”
“एका स्त्रीविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तर…”
“व्हिडीओवर अतिशय वाईट गाणं लावून ‘मातोश्री’ या फेसबूक पेजवरून व्हायरल करण्यात आला. एका तासात ३५० शेअर करण्यात आले. एका स्त्रीविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तर तिचं चारित्र्यहनन करणं किती सोप्प असतं. त्याच पद्धतीने हे करण्यात आलं. याच्या मागील मास्टरमाइंड लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावा. त्याला शिक्षा करण्यात यावी,” अशी मागणी शीतल म्हात्रेंनी केली आहे.
हेही वाचा : “मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर…”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…
“सामाजिक जीवनात काम करत असताना…”
“हा व्हिडीओ कधी, कोणी आणि कसा काढला याची माहिती नाही. कोणत्यातरी चुकीच्या बाजूने व्हिडीओ काढून वेगळं स्वरूप देण्यात आलं. सामाजिक जीवनात काम करत असताना धक्काबुक्की होत असते. परंतु, असा अर्थ लावून चारित्र्यहनन केलं जातं,” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.