ऑनलाईन माध्यम आणि सोशल कम्युनिटी साईट्स यांची सांगड घालत सर्जनशील, प्रतिभावान कलाकारांना हुडकून त्यांना एकत्र आणण्यासाठी ‘क्यूकी’ या सोशल मीडिया साईटची निर्मिती करण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पुढाकार घेऊन ‘क्यूकी’ हे नवे ऑनलाईन व्यासपीठ सुरू केले असून नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याचा शुभारंभ करण्यात आला.
सोशल नेटवर्कीग या प्रभावी माध्यमाचा फायदा घेऊन चित्रपट, संगीत, कथा- पटकथा अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना शोधण्यासाठी, चांगले संगीत-चित्रपट यांचा संग्रह करण्यासाठी शेखर कपूर आणि रेहमान यांनी ऑनलाईन व्यासपीठ निर्माण करण्याची संकल्पना मांडली़  त्यातूनच ‘क्यूकी’ या सोशल मीडिया साईटचा जन्म झाला आहे.
‘क्यूकी’च्या माध्यमातून तुमच्या कल्पना इतरांसमोर मांडता येतील, त्याच्यावर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करता येईल त्याचबरोबर दर्जेदार आशयाचा अभ्यासही करता येईल. ‘क्यूकी’च्या हबवर मी ‘वॉरलॉर्ड’ आणि ‘अ‍ॅनिमेलॉसिटी’ सारख्या अप्रतिम कलाकृती करणार आहे, अशी माहिती शेखर कपूर यांनी यावेळी दिली. तर कुठलाही कलाप्रकार असू दे तुम्हाला या ऑनलाईन व्यासपीठावर त्या क्षेत्रात नवे काही करून दाखवण्याची संधी मिळेल, असे आश्वासन ए. आर. रेहमान यांनी दिले आहे.
‘क्यूकी’वर ए. आर. रेहमान ‘मेलांज’ ही कलाकृती सादर करणार आहेत. पाश्चिमात्य सुरावटींना भारतीय सुरांचा साज चढवण्याचा प्रयत्न ‘मेलांज’मध्ये होणार आहे. यातून आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीतकार घडवण्याचा प्रयत्न असल्याचे रेहमान यांनी स्पष्ट केले आहे.   

Story img Loader