पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही आपत्तीचा सामना करण्याकरिता शासकीय आणि महापालिकांच्या यंत्रणा सज्ज झाल्याचा दावा बुधवारी करण्यात आला. आपत्तीचे प्रकार टाळण्याकरिता शासकीय यंत्रणांनी पाऊले उचलावीत, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाण्यातील ६१ धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे येत्या १५ दिवसांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात आलेल्या घरांमध्ये स्थलांतर करावे, असा आदेशही दिला.
पावसाळ्याचा सामना करण्याकरिता शासकीय यंत्रणांनी योजलेल्या उपायांचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह शासकीय, लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाची तुकडी सध्या तळेगावजवळ तैनात करण्यात आली आहे. मुंबईत पूरपरिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास हे पथक वेळेत मुंबईत पोहचणे कठीण जाईल. यामुळे या दलास मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मिठी नदीचे झालेले रुंदीकरण आणि खोलीकरण तसेच नालेसफाई यामुळे मुंबईत पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा विश्वास मुंबईचे पालिका आयुक्त सीताकाम कुंटे यांनी व्यक्त केला. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, ३० मेपासून मुंबईत खोदकाम करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ात वीज कोसळल्याने मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज पडण्याची ठिकाणे अधोरेखित करून तेथे लोक थांबणार नाहीत या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. लेप्टो, डेंग्युस मलेरिया, टायफॉईड यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता विशेष खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. बोटी, जनरेटर, लाईफ जॅकेट आदी साहित्य प्रत्येक जिल्ह्य़ांमध्ये सज्ज ठेवण्याची सूचना उपमुखअयमंत्री अजित पवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा