लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात जुहू येथील बंगला आणि पवना येथील फार्महाऊस रिकामे करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिशीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने बुधवारी ईडीला नोटीस बजावली व प्रकरणावर गुरुवारी तातडीची सुनावणी ठेवली.

शिल्पा आणि राज यांची याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-Ratan Tata : “आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, याचं दुःख…”, राज ठाकरेंकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा

ईडीने २७ सप्टेंबर रोजी शिल्पा आणि राज यांना नोटीस बजावून त्यांना जुहू येथील राहते घर आणि पवना येथील फार्महाऊस १० दिवसांच्या आत रिकामे करण्याचे आदेश दिले होते. ही नोटीस ३ ऑक्टोबर रोजी मिळाल्यानंतर त्याविरोधात दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने बजावलेली नोटीस मनमानी आणि बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी मागणी शिल्पा आणि राज यांनी केली आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांची जागा तातडीने रिकामी करण्याची आवश्यकता नाही. शिवाय, जुहू येथील घरात याचिकाकर्ते मागील दोन दशकापांसून कुटुंबातील सहा सदस्यांसह राहत आहेत. त्यामुळे, याचिकाकर्त्यांच्या याचिकेकडे मानवतेच्या दृष्टीकोनातूनही पाहिले जावे, अशी विनंती दाम्पत्याच्या वतीने सुनावणीच्या वेळी केली गेली, तसेच, याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत नोटिशीला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

आणखी वाचा-Ratan Tata : २६/११ च्या गोळीबारादरम्यान रतन टाटा ताज हॉटेलजवळ पोहोचले अन्…, मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम; मृतांच्या कुटुंबांना केलेली मोठी मदत

ईडीने २०१८ मध्ये अमित भारद्वाज आणि अन्य काही जणांविरुद्ध बिटकॉइन फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी ईडीने तपासादरम्यान राज कुंद्रा यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले होते. प्रत्येक समन्सनंतर कुंद्रा तपासयंत्रणेसमोर हजर झाले होते. शिल्पा आणि राज दोघांनाही या प्रकरणी आरोपी दाखवण्यात आलेले नाही. त्यातच एप्रिलमध्ये, दाम्पत्याला ईडीद्वारे २००९ मध्ये कुंद्राच्या वडिलांनी खरेदी केलेल्या जुहू येथील निवासी जागेसह त्यांची पुण्यातील मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याच्या आदेशाची नोटीस मिळाली. शिल्पा आणि राज या दोघांनीही नोटीशीला उत्तर दिले. त्यानंतरही, निवासी घर आणि फार्महाऊस रिकामे करण्याबाबतची नोटीस त्यांना पाठवण्यात आली. आपण दोषी असल्याचे सिद्ध होण्याआधीच अशा पद्धतीने नोटीस पाठवली जाऊ शकत नाही. मुळात कुंद्रा यांच्या निवासी जागेचा गुन्ह्याशी किंवा गुन्ह्याच्या कोणत्याही रकमेशी संबंध नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty and raj kundra in high court against ed notice to vacate house in juhu mumbai print news mrj