सोमवारी रात्री मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली आहे. या प्रकरणावरून काल रात्रीपासून चित्रपट क्षेत्रासोबतच मुंबईच्या बी टाऊनमध्ये मोठी खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अटक केल्यानंतर आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याची मोडस ऑपरेंडीच सांगण्यात आली आहे.

आधी वेब सीरिजच्या आमिषाने बोलवलं जायचं…

क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचं. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशा काही महिला कलाकार क्राईम ब्रांचला अप्रोच झाल्या. त्यांच्या तक्रारींवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वेबसाईट्स, मोबाईल अॅप्सला क्लिप्स विकल्या जायच्या…

शा प्रकारे छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या. यात ९ आरोपी आधीच अटकेत आहेत. त्यात रोहा खान, गेहेना वशिष्ट, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि इतरही काही आरोपी अटकेत आहेत. यातले काही प्रोड्युसर देखील आहेत. त्यांचे वेगवेगळे अॅप्स आणि वेबसाईट असायच्या. तिथे या क्लिप्स विकल्या जायच्या.

 

सर्व कामकाज उमेश कामत पाहायचा…

जे अॅप्स सापडले, त्याच्या तपासात असं समोर आलं की उमेश कामत नावाचा व्यक्ती हा इंडिया हेड आहे. राज कुंद्रा यांच्या कंपनीत तो भारतातील कामकाज बघायचा. त्यात खोल तपास केला असता असं निष्पन्न झालं, की राज कुंद्रा यांच्या वियान कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी टायअप आहे. ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्रा यांच्या बहिणीचे पती त्या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचं हॉटशॉट्स नावाचं अॅप होतं. ही कंपनी जरी लंडनमध्ये असली, तरी त्याचा कंटेंट तयार करणं, त्याची व्यवस्था पाहणं हे मुंबईतून वियान कंपनीमधूनच केलं जायचं.

Porn Films Case : राज कुंद्राची आता होणार सखोल चौकशी; न्यायालयानं केली पोलीस कोठडीत रवानगी!

रायन थॉर्प हा राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी हेड!

हे सर्व धागेदोरे सापडले, त्यांचे काही व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले, इमेल सापडले आहेत, अकाउंटिंग शीट्स सापडल्या आहेत. हॉटशॉट्सवरच्या काही चित्रफीत देखील सापडल्या आहेत. कोर्टाच्या परवानगीने त्यांच्या ऑफिसमध्ये शोध घेतल्यानंतर हे सर्व साहित्य सापडलं. म्हणून तपासानंतर राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रायन थॉर्प यांना अटक केली आहे.

 

अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरवरू हॉटशॉट अॅप काढण्यात आलं…

पुढचा तपास सुरू आहे. हॉटशॉट्स नावाच्या अॅपवर पॉर्नोग्राफीक कंटेंट असल्यामुळेच अॅपल स्टोअरने जून २०२०मध्ये काढून टाकलं होतं. नोव्हेंबर २०२०मध्ये गुगल प्लेस्टोअरने देखील हे अॅप काढलं आहे.