‘आदर्श’ चौकशीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याचे टाळण्यात आल्याने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले असून यावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल नाराजीची भावना पसरली आहे.
‘आदर्श’चा कृती अहवाल (अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट) तयार झाला नसल्याने सादर करण्यात आला नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र शिंदे, अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आल्याने हा अहवाल सादर करण्याचे लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. संसदेचे अधिवेशन सोमवारी सुरु होत असताना शिंदे  अडचणीत येऊ नयेत म्हणूनच हे करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

शिंदे आणि चव्हाण यांचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी फारसे सख्य नाही. ‘आदर्श’चा अहवाल सादर करण्याचे लांबणीवर टाकण्यात आल्याने या दोघांबाबत नाहक संशयाचे वातावरण तयार झाल्याची भावना या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये झाली आहे. काँग्रेसमधील संशयकल्लोळाबद्दल राष्ट्रवादीमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.
अहवालातील काही बाबी गंभीर असल्यानेच अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत असले तरी आगामी निवडणुकीपूर्वी हा अहवाल राज्य सरकारला सादर करावाच लागेल. हा अहवाल सादर करण्याचे जेवढे लांबविले जाईल तेवढी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल संशयाची भावना निर्माण होईल, अशी भीती पक्षात आहे.