शीळ येथील दुर्घटनेत ७५ निरपराध व्यक्तींचा बळी गेल्यानंतरही एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न असलेले आमदार एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असल्याचे अभद्र चित्र मंगळवारी ठाणेकरांनी पाहिले. बेकायदा बांधकामांवर पोसलेले आपले बालेकिल्ले धोक्यात आल्याचे पाहून धास्तावलेल्या या नेत्यांनी एकत्र येऊन आणि काँग्रेस, मनसे अशा पक्षांना पंखाखाली घेऊन या प्रश्नावर गुरुवारी ‘ठाणे बंद’ची हाक दिली.
शीळ दुर्घटनेनंतर शिवसेनेने आक्रमकपणे राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर मुंब्य्रातील आमदाराला अटक करा, अशी मागणी करत एकनाथ िशदे यांनी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांचेही निलंबन करण्याची मागणी केली होती. मात्र, ठाणे महापालिकेने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करताच शिवसेनेच्या वाघांची शेळी बनली. या यादीतील अध्र्याहून अधिक बांधकामे शिंदे यांच्या परिसरांतील असल्याने आव्हाडांना अटक करा, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे धाबे दणाणले.
ठाणे शहरात सुमारे पाच हजारांहून अधिक अनधिकृत इमारती असून त्यामध्ये साधारणपणे दहा लाख नागरिक राहतात. त्यांना बेघर करून कसे चालेल, असा सवाल आमदार शिंदे यांनी मंगळवारी सर्वपक्षीय संयुक्त पत्रकार परिषदेत केला. अतिधोकादायक इमारतींमधील कुटुंबांना ‘बीएसयूपी’ आणि ‘एमएमआरडीए’च्या घरांमध्ये तात्पुरता आसरा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रश्नावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाईल, असे आव्हाड यांनी या वेळी स्पष्ट केले.
भाजप मात्र दूर..
िशदे-आव्हाडांच्या या संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचे भाजपच्या नेत्यांनी मात्र टाळले. लोकांमध्ये असुरक्षितता निर्माण करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचे उद्योग या पक्षाकडून सुरू आहेत, असा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी केला. बेकायदा बांधकामांमधील रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे, हीच आमची भूमिका आहे; परंतु त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा