दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याच्या निर्णयानंतर देशभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. सत्ताधारी भाजपाकडून या निर्णयाचं समर्थन होत आहे, तर विरोधी पक्षांकडून हा नोटबंदी फसल्याचा परिणाम असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याचा निर्णय आणि नोटबंदीवर सडकून टीका केली. यावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, “नोटबंदी फसली असती, तर देशाची अर्थव्यवस्था एवढी मजूबत झाली नसती. आज जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडत आहेत. दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेने १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचं पूर्ण श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं.”
“१०१ व्या माठातून संजय राऊतांचा जन्म झाला”
“पुराणात असं सांगतात की, कौरवांचा जन्म १०० माठांमधून झाला होता. १०१ व्या माठातून संजय राऊतांचा जन्म झाला आहे. ते माठ आहेत त्यामुळे ते काय बोलतात याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही,” अशी टीका ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर केली.
“सिल्व्हर ओकच्या काकांकडून संजय राऊतांना दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये…”
ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या, “दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या याची भीती त्यांनाच वाटली पाहिजे ज्याच्याकडे त्या नोटा भरपूर आहेत. शिवसेना संपवण्याचा संजय राऊतांचा पगार तो सिल्व्हर ओकच्या काकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये त्यांच्याकडे येतो आहे का? कदाचित राऊतांच्या घरात कपाटंच्या कपाटं दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेली असतील. त्यामुळेच त्यांना या नोटबंदीची भीती वाटत आहे.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : धक्कादायक !, स्विस बँकेत भारतीयांचे ७ हजार कोटी, ५० टक्क्यांनी झाली वाढ
“ती थुंकी राऊतांच्याच तोंडावर पडणार”
“संजय राऊतांसारख्या किडूकमिडूक माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. ती थुंकी राऊतांच्याच तोंडावर पडणार आहे,” अशी टीका वाघमारेंनी राऊतांवर केली.