शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसेच दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओवर स्वतः शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीतल म्हात्रे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”

पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे म्हणाल्या, “एखादा पुरुष राजकारणात स्त्रिला कसं वागवतो याचे मला अनुभव आले आहेत. मी माझ्या आत्मसन्मानासाठी माझी जीव आणि करियर सर्व पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसलं की असे प्रकार केले जातात.”

“आज हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचं नातं असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करतंय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,” असं मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं.

शीतल म्हात्रेंनी रात्री उशिरा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. त्यावेळी त्या म्हणाले, “मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असं असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातंय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असं वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत.”

हेही वाचा : “शिंदे-फडणवीसांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने…”, संजय राऊतांचा मोठा दावा

“याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. आम्ही त्याविरोधात दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहोत. रात्रीचे पावणेतीन वाजले आहेत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं आहेत. व्हिडीओ पोस्ट करणारे बरेचजण युवासेनेचे कार्यकर्ते आहेत,” असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction leader sheetal mhatre comment on viral video with mla prakash surve pbs