शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर संजय राऊतांनी आम्हाला पेट्रोल टाकून मनोहर जोशींचं घर जाळल्यास सांगितलं”, असा आरोप सदा सरवणकर यांनी केला. या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.
सदा सरवणकर म्हणाले, “मला संजय राऊतांचा फोन आला. तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही कुठे चालले? मला वाटलं मी मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे ते राऊतांना कशाला सांगायचं. ते मला म्हणाले की, तू मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चालला आहेस ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, उद्धव ठाकरेंकडून किंवा मातोश्रीवरून राऊतांनी याबाबत कुणीतरी सांगितलं असावं.”
“जाऊन मनोहर जोशींचं घर जाळून टाक”
“राऊतांनी मला मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे का विचारल्यावर मी हो चाललो आहे सर असं उत्तर दिलं. त्यावर ते म्हणाले की, असाच जाऊ नकोस. जाऊन मनोहर जोशींचं घर जाळून टाक. काही शिल्लक ठेऊ नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे. तिथून पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका,” असं सदा सरवणकरांनी सांगितलं.
“गद्दारांमध्ये गेल्यावर असं २०-२५ वर्षांनी सांगत आहेत”
यावर अंबादास दानवे म्हणाले, “सदा सरवणकरांना काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारांमध्ये गेल्यावर असं २०-२५ वर्षांनी सांगत आहेत. त्याचवेळी सांगितलं असतं, तर बरं झालं असतं.”