मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी शिवेसना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा दावा करीत शिवसेना शिंदे गटाने बुधवारी विधानसभेचे कामकाज रोखले. दिशाच्या वडिलांनी थेट संशय व्यक्त केल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना ठाकरे गटाने मात्र उभय सभागृहात मौन बाळगणेच पसंत केले.

शिवसेनेचे (शिंदे) संजय गायकवाड यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा सभागृहात उपस्थित केला. दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली असून त्यात आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ आरोप झाला म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकणात ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

गायकवाड यांच्या या भूमिकेस सत्ताधारी सदस्यांनी जोरदार पाठिंबा देत अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. या गोंधळात अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. सरकारच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला जाईल. हा अहवाल या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला दिला जाईल आणि विशेष तपास पथकाच्या अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

दोषींवर कडक कारवाई

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करा. दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपावरून आदित्य ठाकरे यांची चौकशी करा, अशी आक्रमक मागणी भावना गवळी यांनी विधान परिषदेत केली. सरकारच्या वतीने उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात नव्याने आरोप झाले आहेत. नव्या आरोपांनुसार पुन्हा चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल.