वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीत तास या दोघांमध्ये खलबंत सुरू होती. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तावाहिनी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – मोठी बातमी! एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अडीच तास खलबतं; राजकीय चर्चांना उधाण
काय म्हणाले नरेश म्हस्के?
“सर्व पक्षांना घेऊन महाराष्ट्राचा विकास करावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे. आज इंदू मिल असेल किंवा राजगृहाचा मुद्दा आहे. यासंदर्भात ही बैठक झाली असावी. प्रकाश आंबेडर यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे. त्यांच्याबरोबर जाण्यापूर्वी आपल्याला विचार करावा लागेल. काँग्रेसने बाबासाहेब आंबेकडकरांना नेहमीच विरोध केला आहे. त्यांच्या विचारापासून काँग्रेस नेहमीच दूर राहिली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या असतात, दोन्ही नेते लवकरच भूमिका स्पष्ट करतील. ही गुप्त बैठक म्हणता येणार नाही. ही वर्षा बंगल्यावर झालेली बैठक आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
हेही वाचा – गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानानंतर शिंदे गटाचे संजय गायकवाड आक्रमक, म्हणाले “कोणी मुर्खासारखे…”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाविरोधात धक्कातंत्राचा वापर होतो आहे, ही भेटही त्याचा भाग आहे का? असं विचारलं असता, “जेव्हा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना विरोध केला. शेवटी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काही पावलं उचलने गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. विरोधाला विरोध न करता चांगल्या कामासाठी एकमेकाला पाठिंबा देणं आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.