मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेता आदेश बांदेकर यांच्याकडे या पदाची सूत्रे गेल्या अनेक वर्षांपासून होती. परंतु, आता मंदिर न्यायासचे अध्यक्षपद सदा सरवणकरांकडे गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान, याबाबत सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून सिद्धिविनायकसारख्या पवित्र संस्थेची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्ष मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता मला गणेश भक्तांसाठी बरंच काम करता येईल” , असं सदा सरवणकर म्हणाले.

हेही वाचा >> सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आदेश बांदेकरांना हटवलं, शिंदे गटातील आमदाराची नियुक्ती

“सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कोणत्याही गटाकडे नव्हतं. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि गेल्या अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवेसनेकडे होतं. त्याच विचाराने पूर्वी असलेल्या शिवसेनेकडे ही जबाबदारी आली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्त्वाचे विचार, गणेशभक्तांच्या भावना पूर्ण करण्याची संधी आणि गटातटाचा विचार न करता भाविकांना जास्तीत जास्त कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील याचा प्रयत्न केला जाईल”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला होता. तेव्हा सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. पण, चौकशीनंतर सरवणकर यांना क्लिन चिट मिळाली होती. याच प्रकरणामुळे सरवणकर यांचं मंत्रीपद हुकल्याची चर्चा होती.

अशातच आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आदेश बांदेकर यांना हटवून सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mla sada sarvankars first reaction after he selected as a chairman of siddhivinayk temple trust sgk