सागर राजपूत, इंडियन एक्स्प्रेस
मुंबई : मुंबई महापालिकेने करोना टाळेबंदीत स्थलांतरीत मजुरांसाठी राबलेल्या खिचडी वितरण योजनेतील कथित अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल झालेली कंत्राटदार संस्था शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मालकीची असल्याचे उघड झाले आहे.‘दि इंडियन एक्स्प्रेसन’ने माहिती अधिकार कायद्याचा वापर करून या आठ कोटी ६४ लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कंत्राटदार संस्थेचा तपशील मिळवला आहे. मजुरांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरचिटणीस संजय मशीलकर यांच्या मालकीच्या ‘फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस’ या कंपनीला देण्यात आले होते.
या कंपनीविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करताना कंपनीचे अनोळखी भागीदार, कंपनीचे कर्मचारी, त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावांची नोंद केली होती. तथापि, संजय मशीलकर यांचे प्रीतम आणि प्रांजल हे दोन्ही पुत्र या संस्थेचे भागिदार असल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले. मशीलकर यांनी मात्र या कथित गैरव्यवहारप्रकरणात त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.खिचडीचे कंत्राट २०२०मध्ये संजय मशीलकर यांच्या संस्थेला दिले गेले होते. त्यावेळी मशीलकर शिवसेनेचे उपसचिव होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले.
माझा या प्रकरणात सहभाग नाही. संस्थेचे काम पाहण्यासाठी मी त्यावेळी दोन लोकांना नेमले होते. -संजय मशीलकर, सरचिटणीस, शिवसेना (शिंदे गट)