ठाण्यातील तलावपाळी येथे दिवाळी पहाटसाठी शिंदे गटाला महानगरपालिकेने दिलेली परवानगी योग्य असल्याचे नमूद करून या निर्णयाला आव्हान देणारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.
तलावपाळी येथे शिंदे गटाला दिवाळी पहाटसाठी दिलेली परवानगी राजकीय हेतूने असल्याचा दावा करुन ठाकरे गटाचे मंदार विचारे यांनी याचिका केली होती. या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या आपल्याकडे असूनही परवानगी अर्जाचा विचार महानगरपालिकेने केला नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला. शिवाय शिंदे गटाच्या अर्जाबाबत आपल्याला कळवण्यात आले नसल्याचेही ठाकरे गटातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. शिंदे गटाने १९ सप्टेंबर रोजी परवानगीसाठी अर्ज केला होता, तर ठाकरे गटाने ३ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यामुळे शिंदे गटाला आवश्यक त्या परवानग्या घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी सगळ्या परवानग्या वेळेत दाखल केल्याने त्यांना परवानगी दिली, असे ठाणे महानगरपालिकेने न्यायालयाला सांगितले.
न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी आम्हीच या ठिकाणी वर्षानुवर्षे दिवाळी पहाट आयोजित करत आलो आहोत, असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. तर आम्ही खरी युवासेना असल्याचा दावा ठाकरे गटाने केला.
न्यायालयाने ठाकरे गट, शिंदे गट आणि महानगरपालिकेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाकरे गटाची याचिका गुणवत्तेच्या निकषांवर टिकणारी नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे नमूद करून न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली.
महापालिकेने दिवाळी पहाटसाठी दोन्ही गटास परवानगी दिली होती. परंतु पोलिसांनी मात्र दोन्ही गटांना परवानगी दिली नव्हती. गेल्या १२ वर्षांपासून आम्हीच दिवाळी पहाटचा कार्यक्रम करत असल्याचे दावे करत दोन्ही गटांनी त्याचठिकाणी कार्यक्रम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.या दाव्यांमुळे सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात आता दिवाळी पहाट कार्यक्रमावरून राजकारण तापलं होतं.
ठाणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. नव वर्ष स्वागत यात्रा, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सण शहरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. याशिवाय, दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही शहरात ठिकठिकाणी आयोजन करण्यात येतं. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव परिसरात अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. परंतु याठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं होतं.